नवी मुंबई : उन्हाळी सुटीत मुलांना केवळ खरेदी नव्हे, तर खेळ, कल्पनाशक्ती आणि साहसाचा अनोखा अनुभव देण्यासाठी वाशीतील इनऑर्बिट मॉल येथे ‘जेंटल जायंट्स’ हा भव्य आणि आकर्षक उपक्रम सुरू करण्यात आला आहे. मुलांसाठी खास उभारण्यात आलेल्या या थीम-आधारित दुनियेत विशालकाय रचना, रोमांचक खेळ आणि सहभागात्मक उपक्रमांमुळे मॉलचे रूपांतर एका कल्पनारम्य विश्वात झाले आहे.
या उपक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे तब्बल २५ बाय २५ बाय १५ फूट आकाराचा ‘सेंट्रल जायंट’. विविध रंगसंगती, आकर्षक टेक्स्चर आणि विशाल सजावटीमुळे हा भाग मुलांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे. ‘एस्केप द जायंट्स स्टमक मेझ’सारख्या भूलभुलैय्या, ‘मॉन्स्टर क्लाइंब’, ‘बॅलन्स द लीव्ह्स’ आणि ‘रिअॅक्शन बटाक गेम’सारखे साहसी खेळ मुलांना थरारक अनुभव देत आहेत.
‘पोलन टॉस’ आणि ‘रिंग-अ-मॉन्स्टर’सारख्या खेळांमधून मुलांना प्रत्यक्ष सहभागाची संधी मिळत असून, खेळताना त्यांची हालचाल, समन्वयकौशल्य आणि सहभाग वाढावा, यावर विशेष भर देण्यात आला आहे. संपूर्ण परिसरात विशाल फुलांच्या सजावटी, मॉन्स्टर-थीम डिझाइन आणि मऊ सुरक्षित संरचना तयार करण्यात आल्या आहेत.
मुलांना मोबाइल आणि स्क्रीनपासून दूर ठेवून प्रत्यक्ष खेळ, साहस आणि कौटुंबिक सहभागाचा अनुभव देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला आहे. त्यामुळे सुटीत कुटुंबांसाठी हे ठिकाण आकर्षणाचे केंद्र बनले आहे.