वाशीतील इनऑर्बिट मॉलमध्ये ‘पिंक रिटर्न फेस्टिव्हल’चा दिमाखात शुभारंभ; निसर्ग, कला आणि साहित्याचा रंगणार अनोखा संगम
वाशी इनऑर्बिट मॉलमध्ये पिंक रिटर्न फेस्टिव्हलचा शुभारंभ; निसर्ग, कला व साहित्याचा अनोखा उत्सव.
नवी मुंबई : नवी मुंबईचे वैभव असलेल्या फ्लेमिंगो पक्षांचे (रोहित पक्षी) आगमन शहरात झाले आहे. या निमित्ताने वाशी येथील इनऑर्बिट मॉल सज्ज झाला आहे आपल्या आगळ्यावेगळ्या ‘पिंक रिटर्न फेस्टिव्हल’ साठी! जानेवारी ते फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात निसर्ग, छायाचित्रण, वन्यजीव संवर्धन आणि साहित्याची मेजवानी पर्यटकांना मिळणार आहे.
या महोत्सवाची सुरुवात ४ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजता होणाऱ्या विशेष फ्लेमिंगो फोटोवॉकने होणार आहे. प्रसिद्ध निसर्ग व वन्यजीव छायाचित्रकार डॉ. सिझर सेनगुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या फोटोवॉकमध्ये छायाचित्रणप्रेमी आणि निसर्ग अभ्यासकांना फ्लेमिंगोचे मोहक क्षण टिपण्याची संधी मिळणार आहे. या उपक्रमातून जैवविविधता संवर्धनाबाबत जनजागृती करण्याचाही प्रयत्न करण्यात येणार आहे.
यानंतर १६ ते १८ जानेवारी या कालावधीत इनऑर्बिट मॉलमध्ये फ्लेमिंगो फोटोग्राफी प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. या प्रदर्शनासोबतच डॉ. सिझर सेनगुप्ता यांचे विशेष संवाद सत्र, फ्लेमिंगो थीमवरील मुलांसाठी उपक्रम, पॉप-अप स्टोअर्स तसेच आकर्षक स्ट्रिंग म्युरल आर्ट इन्स्टॉलेशन पाहायला मिळणार आहे. हे म्युरल प्रेक्षकांसाठी खास फोटो-ऑप म्हणूनही आकर्षण ठरणार आहे.