मधुमेहींनी धाप, थकवा दुर्लक्षित करू नये; हृदयविकाराचे असू शकतात संकेत
नवी मुंबई : मधुमेह हा केवळ रक्तातील साखरेशी संबंधित आजार नसून तो हृदयाच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम करू शकतो. मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये ...
नवी मुंबई : मधुमेह हा केवळ रक्तातील साखरेशी संबंधित आजार नसून तो हृदयाच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम करू शकतो. मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये हृदयविकाराचा धोका लक्षणीयरीत्या अधिक असतो. मात्र, धाप लागणे, सतत थकवा जाणवणे, व्यायाम किंवा शारीरिक हालचाल करण्याची क्षमता कमी होणे, छातीत सौम्य अस्वस्थता यांसारखी लक्षणे अनेकदा वाढते वय, ताणतणाव किंवा व्यस्त जीवनशैलीचा परिणाम समजून दुर्लक्षित केली जातात. त्यामुळे ही लक्षणे गांभीर्याने घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयाचे इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. ब्रजेश कुंवर यांनी सांगितले की, मधुमेहामुळे कालांतराने रक्तवाहिन्यांचे नुकसान होते आणि कोरोनरी आर्टरी डिसीजचा वेग वाढतो. त्यामुळे हृदयाशी संबंधित गुंतागुंत होण्याचा धोका वाढतो. अनेक मधुमेही रुग्ण रक्तातील साखर नियंत्रणावर लक्ष केंद्रित करतात; मात्र हृदयाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. विशेषतः दीर्घकाळ मधुमेह असलेल्या रुग्णांनी धाप लागणे, कारण नसताना थकवा जाणवणे, व्यायाम करण्याची क्षमता कमी होणे किंवा छातीत सौम्य वेदना अथवा अस्वस्थता यांसारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.